दत्ताराम दुदम सरांचे काका मुंबईच्या शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे माळी म्हणून कार्यरत होते. कोकणातील संगमेश्वरहून वयाच्या आठव्या वर्षी दुदम सर काकांसोबत समर्थमध्ये आले. दररोज आपल्या काकांना मदत करता करता श्री समर्थ व्यायाम मंदिरामध्ये मल्लखांब खेळणाऱ्या खेळाडूंना पाहून दुदम सरांना त्यात रस वाटू लागला. नंतर मल्लखांबाचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. दुदम सरांनी हलाखीच्या परिस्थितीतही गुरुवर्यांचे मार्गदर्शन आणि स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मल्लखांबाच्या खेळात सलग ७ वर्ष राष्ट्रीय पातळीवर, ११ वर्ष राज्य पातळीवर, १४ वर्ष जिल्हा पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण देशात अव्वल क्रमांक व मानाचे स्थान पटकावले.
सरांचा संच सुरू झाला, की सर्वांच्या नजरा त्यांच्या खेळाकडे लागत असत. चहुबाजूंनी दत्ता, दत्ता असा गजर होत असे. त्यांच्यासारखे मल्लखांबावरील हॅंडस्टॅंड (दोन्ही हातांवर मल्लखांबाच्या टोकाशी तोल सावरत उलटे उभे राहण्याचे कसब) हा प्रकार त्यांच्याइतका लाजवाब कुणी केला नाही. त्यांना हॅंडस्टॅंड किंग म्हणून संबोधले जायचे. दुदम सरांना त्यांच्या खेळातील योगदानाबद्दल १९७९-८० साली महाराष्ट्र शासनाचा मानाचा श्रीशिवछत्रपती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. मल्लखांबा बरोबरच जिम्नॅस्टिक्समध्येही राष्ट्रीय पातळीवर दुदम सरांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मल्लखांबाच्या जोरावर मिळवलेल्या किर्तीमुळे पश्चिम रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळाली आणि महाराष्ट्र शासनाकडून घरही मिळाले. खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर दुदम सर प्रशिक्षक, पंच, कार्यकर्ते, संघटक अशा विविध स्तरावर मोलाची कामगिरी बजावत राहिले. मल्लखांब खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते अविरत झटले.
बोरीवली मध्ये राहायला आल्यावर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या स्थापनेपासून संघटनेच्या प्रगतीशील वाटचालीमध्ये दुदम सरांचा सिंहाचा वाटा आहे. आज मुंबई उपनगरात सुमारे ५० संस्था सरांच्या पुढाकाराने उभ्या राहिल्या आहेत आणि मल्लखांबासाठी कार्यरत आहेत. दुदाम सरांनी १२ वर्षे प्रमुख कार्यवाह आणि ४ वर्षे कार्याध्यक्ष म्हणून संघटनेची धुरा सांभाळली. सर्वांना बरोबर घेऊन मल्लखांब खेळ घराघरात पोहोचवणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. त्यांचे स्वप्न होते की, जसा क्रिकेट हा खेळ प्रत्येक घरात, गल्लीबोळात खेळला जातो, तसाच मल्लखांब हा खेळही लोकप्रिय झाला पाहिजे. दुदम सरांच्या मार्गदर्शनामुळे विविध खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, संघटक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घडत गेले. कोविड महामारी मध्ये दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजी सरांचे निधन झाले.