मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना

मल्लखांब खेळाचा इतिहास

मल्लखांबाचा इतिहास

मल्लखांबाचा उगम पुणे येथील दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात झाला. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध राज्यांमधून विजय मिळवत आलेल्या हैदराबादच्या निजामाकडील अली व गुलाब या दोन कसलेल्या, बलाढ्य पैलवानांनी पुणे येथील दुसरे बाजीराव पेशवे यांच्या भर दरबारात कुस्तीचे आव्हान दिले.  पैलवानांचा आत्मविश्वास, त्यांची रग व तयारी बघून पेशव्यांच्या दरबारात असलेल्या पैलवानांपैकी एकाचीही आव्हान स्विकारण्याची हिंमत झाली नाही.  पेशव्यांची इभ्रत जपण्यासाठी नाशिक जवळ कोठुरे गावी जन्मलेल्या आणि पेशव्यांच्या दरबारी शारिरिक प्रशिक्षण देणाऱ्या बाळंभट्टदादा देवधर यांनी ते आव्हान स्विकारले व तयारीसाठी काही मुदत मागून घेतली.  त्यानंतर, त्यांनी नाशिक जवळ त्यांच्या गावी म्हणजेच कोठुरे येथे जाऊन वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तश्रृंगी देवीची प्रार्थना केली व घडलेल्या प्रकारातून मार्ग दाखवण्याची विनंती केली. 

अशी अख्यायिका आहे की, त्या रात्री सप्तश्रृंगी देवी बाळंभट्टदादा देवधर यांच्या स्वप्नांमध्ये आली व ताकदीचे प्रतिक असलेले स्वत: मारुतीराय त्यांना कुस्तीचे डावपेच दाखवतील असा आशिर्वाद दिला.  दुस-या दिवशी बाळंभट्टदादा देवधर स्नानसंध्या उरकून परतत असताना त्यांना वाटेत एका बलाढ्य वानराच्या रुपात मारुतीराय यांनी दर्शन देऊन एका लाकडी (लाटेवर) खांबावर जवळजवळ तीन दिवस वेगवेगळ्या उड्या करून दाखवल्या व बाळंभट्टदादांचा सराव करून घेतला.  ते पाहून बाळंभट्टदादा देवधर यांनी माणसाच्या देहाप्रमाणे दिसणारा विशिष्ट खांब तयार करुन घेतला व मारुतीरायने दिलेल्या दृष्टांतानुसार/शिकवणीनुसार त्या खांबावर विविध उड्यांचा सराव केला.  त्यानंतर बाळंभट्टदादा देवधर तयारीनिशी ठरलेल्या मुदतीत पुण्यात परतले आणि त्यांनी निजामाकडील मातब्बर मल्लांपैकी अली या मल्लाचा खांबावर केलेल्या सरावाचे डावपेच वापरत गळखोड्याच्या डावाने काही क्षणातच पराभव केला व ते पाहून दुसरा मल्ल गुलाब घाबरुन पळून गेला.  तेव्हापासून कुस्तीसाठी पुरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांब उदयाला आला.  कुस्ती खेळणारा ‘मल्ल’ व त्याला सराव करण्यासाठी पुरक व्यायाम म्हणून आवश्यक असलेला ‘खांब’ अशाप्रकारे या खेळाला मल्लांचा खांब म्हणून ‘मल्लखांब’ अशी ओळख प्राप्त झाली.

पुढे पेशव्यांबरोबर बाळंभट्टदादा देवधर जिथे फिरले तिथे तिथे त्यांनी कुस्तीचे आखाडे सुरु केले आणि आखाड्यांमध्ये मल्लखांब रुजवला.  बाळंभट्टदादा देवधर यांनी पुणे, वाराणसी, बडोदा, सुरत, भोपाळ, उज्जैन, देवास, इंदूर, झाशी, ग्वाल्हेर, इत्यादी ठिकाणी आखाडे सुरु केले व कुस्ती बरोबरच मल्लखांबाचा प्रचारप्रसार केला.  

या प्रवासात बाळभट्टदादा देवधर यांच्या शिष्यांची माहिती देणारा अंदाजित तक्ता खालीलप्रमाणे आहे.

सोमेश्वर चालुक्याने बाराव्या शतकात सन 1135 मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांबाचा उल्लेख व मल्लखांबावरील कसरतींची काही छायाचित्रे आढळतात.  ओरिसामधील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराशेजारी, पंधराव्या शतकात सुरु झालेल्या जगन्नाथ वल्लभ आखाड्यामध्ये स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरु असल्याचे म्हटले जाते.

मल्लखांबाचे जनक

मल्लखांबाचे आकार, प्रकार आणि फायदे

मल्लखांबाचे आकार व प्रकार अनेक प्रकारचे आहेत.  पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला मल्लखांब हा शिसव अथवा सागवान लाकडाचा असतो.  ह्या खांबाची रचना मानवी शरीराप्रमाणेच सर्वात वर डोक नंतर मान व त्याखाली शरीर याप्रमाणे असते व हा खांब वरच्या दिशेने निमुळता होत जातो. त्यामुळे, सर्वात वर मानवी डोक्यासारख्या गोलाकृती भाग म्हणजे बोंड, त्याच्या खाली मानेसारखा भाग आणि त्याच्या खाली बुंध्यापर्यंतचा भाग म्हणजे शरीर होय.  मल्लखांबावरील कसरतींचे विविध गट आहेत त्यामध्ये अढी, तेढी, फिरकी, वेल, सुईदोरा, झाप, फरारे, आसने, आरोहण अवरोहण उड्या, ताजवे, इत्यादी बाबींचा समावेश आहे.  मल्लखांबाचे सुद्धा विविध प्रकार आहेत, जसे की, पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, वेताचा मल्लखांब, निराधार मल्लखांब, बाटल्यांवरचा मल्लखांब, उसाचा मल्लखांब, हत्यारी मल्लखांब, मशाली मल्लखांब, मनोरे मल्लखांब, इत्यादी.  स्पर्धात्मक मल्लखांबामध्ये पुरलेला, टांगता व दोरीचा मल्लखांब या तीन प्रकारांचा वापर केला जातो.  सद्यस्थितीत मल्लखांबाच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होतात.

मल्लखांब हा प्राचीन भारतीय खेळ असून मल्लखांबावरील विविध कसरतींमुळे, मानवी शरिरामध्ये सृदृढता, चपळता, लवचिकता, संतुलन, साहस, एकाग्रता, इत्यादी गुण वाढीस लागण्यास व त्यांचा विकास होण्यास मदत होते.  एकुणच, मल्लखांबामुळे माणसाचा शारिरिक / शैक्षणिक / बौधिक विकास असा सर्वांगिण विकास करणे शक्य असून मल्लखांब हा विश्वसनीयरित्या निरोगी जीवनशैलीला चालना देणारा पारंपारीक क्रीडा प्रकार आहे.

पुरलेला मल्लखांब

हा खांब जमिनीमध्ये थोडा पुरून स्थिर उभा  केलेला असतो. हा खांब जमीनीपासून साधारणतः 9 ते 10 फूट उंच आणि जमिनीच्याखाली 2.5 फूट पुरलेला असतो. त्याचा व्यास तळाशी 5 ते 6 इंच आणि वर जाताना कमी होत डोक्याकडे 1.5 ते 2 इंच इतका असतो. मल्लखांब तयार करताना सामान्यतः सागवान किंवा शीसम लाकूड त्याच्या भौतिक गुणधर्मांमुळे वापरले जाते, जसे की कडकपणा आणि मऊ पृष्ठभाग. या मल्लखांबाला एरंडेल तेल लावले जाते, जे जास्त घर्षण कमी करण्यास मदत करते. खेळाडू या मल्लखांबावर विविध कसरतीचे प्रकार आणि स्थिर स्थिती सादर करतात.

टांगता मल्लखांब

मल्लखांबाचा हा प्रकार पुरलेल्या मल्लखांब सारखाच आहे, परंतु हा पुरलेल्या मल्लखांबापेक्षा लहान आकाराचाअसतो. हा मल्लखांब जमिनीत पुरण्याऐवजी जमिनीपासून थोड्या अंतरावर हुक आणि साखळीच्या साहाय्याने जमिनीपासून अडीच ते तीन फूट उंचीवर टांगलेला असतो. हा मल्लखांब प्रकार करताना स्विंग आणि फिरत्या गतीमुळे त्यावर व्यायाम करणे अवघड असल्याचे दिसून येते. पूर्ण शरीर या मल्लखांबाच्या अगदी जवळ ठेवावे लागते.

दोरीचा मल्लखांब

या प्रकारात, १८ ते २० फुटांवरून खाली सोडलेल्या दोरीवर व्यायामाचे प्रकार केले जातात. ही दोरी सामान्यत: 5.5 मीटर (18 फूट) लांब आणि अंदाजे 1 ते 2 सेंटीमीटर (0.39 ते 0.79 इंच) व्यासाची असते. ही दोरी हातांमध्ये व पायाच्या बोटांमध्ये घट्ट पकडली जाते. दोरीवर चढून वर गेल्यावर, खेळाडू  समतोल राखून आसनांचे  विविध प्रकार निर्धारित वेळेत सादर करतो. या मध्ये खेळाडूने दोरीला कोणत्याही प्रकारे गाठ न बांधता विविध व्यायाम प्रकार सादर करणे अपेक्षित आहे.

मल्लखांबाचे विशेष फायदे

Flexibility

लवचिकता

Coordination

समन्वय

Core Strength

शारीरिक सुदृढता

Mental Focus

एकाग्रता